menu
ब्रेकिंग न्यूज
ताज्या बातम्यांसाठी पेज रिफ्रेश करा...

ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपींना महिना उलटूनही अटक नाही; बिरसा फायटर्सचा तीव्र आंदोलनाचा इशारा

 

​ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपींना महिना उलटूनही अटक नाही; बिरसा फायटर्सचा तीव्र आंदोलनाचा इशारा




​नंदुरबार (प्रतिनिधी): अर्जुन पावरा 

दोंडाईचा शहरात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल होऊनही महिनाभराचा कालावधी उलटला तरी आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रशासकीय निष्क्रियतेच्या निषेधार्थ आणि आरोपींना तात्काळ बेड्या ठोकून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी 'बिरसा फायटर्स' संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मागणी मान्य न झाल्यास पोलीस प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

​याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार निलेश सोमनाथ वाघ यांनी १५ जून २०२६ रोजी दोंडाईचा शहर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार (गुन्हा क्र. १८५/२०२६), विजय शिवाजी मराठे, सचिन विजय मराठे, राहुल उर्फ विशाल विजय मराठे आणि महेंद्र शिंदे यांच्यावर ॲट्रॉसिटी प्रतिबंधक अधिनियम आणि भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, गुन्हा नोंद होऊनही पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

​हे आरोपी अवैध दारू आणि बोगस ताडी विक्रीसारख्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये कुप्रसिद्ध आहेत. ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखल गुन्हे अजामीनपात्र स्वरूपाचे असतानाही आरोपी मोकाट फिरत आहेत. त्यांच्या या मुक्त वावरामुळे पीडित कुटुंब आणि साक्षीदारांवर दबाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच पुरावे नष्ट केले जाण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या या उदासिनतेमुळे सर्वसामान्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे.

​या प्रकरणी धुळे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि दोंडाईचा पोलीस निरीक्षक यांना शाहदा तहसीलदारांमार्फत निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या वेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, जगदीश डुडवे, लक्ष्मी बाई पावरा यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल न घेतल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि होणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा संघटनेने दिला आहे.


टीम.आदिवासी इंडिया न्यूज (डिजिटल मीडिया)

मागील पृष्ठ पुढील पृष्ठ
शेअर करा