बिरसा फायटर्सच्या इशाऱ्यानंतर पिंपर्डेच्या ग्रामसेविका दिपाली उगलमुगले यांचा जाहीर माफीनामा
शिपायाला धमकावल्याचे व कर्तव्यात कसूर केल्याचे प्रकरण; आक्रमक पवित्र्यानंतर वाद मिटला
शहादा (प्रतिनिधी - अर्जुन पावरा):
शहादा तालुक्यातील पिंपर्डे ग्रामपंचायत येथील ग्रामसेविका श्रीमती दिपाली अरविंद उगलमुगले यांनी अखेर ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि बिरसा फायटर्स संघटनेच्या आक्रमक पवित्र्यासमोर नमते घेतले आहे. त्यांनी ग्रामपंचायत शिपायाची सर्वांसमक्ष जाहीर लेखी माफी मागितल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. शिपायाला व्हॉट्सॲपवर धमकी देणे, कर्तव्यात कसूर करणे आणि गैरवर्तन केल्याच्या आरोपांनंतर हे प्रकरण तालुक्यात चांगलेच तापले होते.
कर्तव्यात कसूर आणि व्हॉट्सॲपवरील धमकीचा वाद
पिंपर्डे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका गेल्या तीन महिन्यांपासून कार्यालयात येत नव्हत्या, ज्यामुळे गावकऱ्यांची अनेक महत्त्वाची कामे रखडली होती आणि त्यांच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत होते. याविषयी पिंपर्डेचे उपसरपंच घनश्याम मराठे यांनी गंभीर आरोप केले होते की, ग्रामसेविका गावकऱ्यांशी व कर्मचाऱ्यांशी नेहमी उद्धटपणे बोलून गैरवर्तन करतात. याच दरम्यान ग्रामसेविका उगलमुगले यांनी ग्रामपंचायत शिपाई दिनेश लोटन वाघ यांना व्हॉट्सॲपवर थेट धमकीवजा मेसेज पाठवला होता. 'तू समोर भेट फक्त आता दाखवते तुला, तू विचार करून ठेव आता' अशा स्वरूपाचा मेसेज पाठवल्यामुळे ग्रामस्थ आणि कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती.
बिरसा फायटर्सचा निलंबनाचा इशारा आणि जाहीर माफीनामा
या गंभीर प्रकारानंतर बिरसा फायटर्स संघटनेने आक्रमक भूमिका घेतली. आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि कर्मचाऱ्यांना धमकावणाऱ्या ग्रामसेविकेला तात्काळ सेवेतून निलंबित करावे, या मागणीचे निवेदन संघटनेतर्फे शहादा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. प्रशासनाने तात्काळ निलंबन न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला होता.
संघटनेचा वाढता दबाव आणि आंदोलनाचा इशारा पाहता पिंपर्डे येथे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ग्रामविकास अधिकारी दिपाली उगलमुगले यांनी आपली चूक मान्य केली. आपल्याकडून व्हॉट्सॲप ग्रुपवर अपशब्द, बदनामी आणि अपमानित करणारे शब्द वापरले गेल्याचे मान्य करत त्यांनी तक्रारदार शिपाई दिनेश वाघ यांची जाहीर लेखी माफी मागितली. तसेच यापुढे अशी कोणतीही घटना घडणार नाही याची पूर्ण दक्षता घेईल, असे लेखी आश्वासन त्यांनी दिल्याने या प्रकरणावर तूर्तास पडदा पडला आहे. दरम्यान, बिरसा फायटर्स संघटनेने दिलेल्या या दणक्याची संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
