कृषी पत्रकारितेचा बहुमान! 'दैनिक सकाळ'चे ज्येष्ठ पत्रकार भिलाजी जिरे यांना मुंबईत प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक कृषी पत्रकार पुरस्कार' प्रदान!
मुंबई: आदिवासी आणि ग्रामीण भागातील शेती, जलसंधारण आणि दुर्गम पाड्यांमधील परिवर्तनाच्या यशोगाथांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून राज्यभर पोहोचवणारे 'दैनिक सकाळ'चे ज्येष्ठ पत्रकार भिलाजी दिगंबर जिरे यांचा मुंबईत भव्य सन्मान करण्यात आला आहे. कृषी आणि विकास पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या तब्बल २० वर्षांपासून अविरतपणे कार्यरत असणाऱ्या जिरे सरांना यंदाचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक कृषी पत्रकार पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण चव्हाण सभाग्रुहात झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला असून, कृषी पत्रकारितेतील त्यांच्या या उल्लेखनीय योगदानामुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून त्यांचे कौतुक होत आहे.
📍 अनेक दिग्गज मंत्र्यांची उपस्थिती
हा सोहळा अत्यंत उत्साहात पारडला असून यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र बारवाले, अविनाश नाईक आणि दीपक पाटील यांसारख्या विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी भिलाजी जिरे यांच्या ग्रामीण विकासामिमुख पत्रकारितेचे आणि शेतकरी हितासाठी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याचे विशेष कौतुक केले.
🌱 कुडाशी गाव ते मुंबई: २० वर्षांचा संघर्षमय प्रवास
भिलाजी जिरे हे मूळचे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या कुडाशी येथील रहिवासी आहेत. एम.ए. व बी.एड, शारीरिक शिक्षण पदवीधारक असलेल्या जिरे यांनी २१ एप्रिल १९९८ पासून 'दैनिक सकाळ'च्या माध्यमातून आपल्या पत्रकारितेचा प्रवास सुरू केला. त्यांनी साक्री तालुक्याच्या दुर्गम व आदिवासी पश्चिम पट्ट्यातील कृषी, जलसंधारण, आधुनिक शेती, वनसंपत्तीवर आधारित रोजगार, शाश्वत विकास आणि ग्रामीण परिवर्तन या विषयांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. त्यांच्या संवेदनशील लेखणीमुळे दुर्गम भागातील शेतकरी, महिला बचत गट, आदिवासी समाज आणि नवउद्योजकांच्या संघर्षाच्या कथांना राज्यस्तरावर ओळख मिळाली.
💡 लेखणीने घडवले ग्रामीण भागात परिवर्तन
भिलाजी जिरे यांच्या सकारात्मक वार्तांकनामुळे ग्रामीण भागात अनेक नाविन्यपूर्ण प्रयोगांना गती मिळाली:
- स्मार्ट फार्मिंग: जुकिनी, स्ट्रॉबेरी आणि व स्मार्ट फार्मिंगद्वारे मक्याचे विक्रमी उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले.
- जलक्रांती व तंत्रज्ञान: तुपिन फौंडेशनची जलक्रांती आणि 'सगुणा राईस टेक्नॉलॉजी' (SRT) सारख्या आधुनिक पद्धतींना व्यापक प्रसिद्धी दिली.
- आदिवासी रोजगार: पंतप्रधान वनधन योजना, शबरी ब्रेड, रासायनिकमुक्त गावरान गूळ उद्योग आणि मशरूम शेती या उपक्रमांना प्रसिद्धी देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ दिले.
📸 सोहळ्याला हितचिंतकांची मोठी उपस्थिती
या गौरवशाली पुरस्कार सोहळ्यास ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप, चंद्रकांत घरटे, अनिल बोराडे, रमेश इंगळे, योगेश रायते, मोहित जिरे, संगीता जिरे, आशाताई इंगळे, पल्लवी जिरे, भाग्यश्री जिरे, जयश्री रायते, वैभवी घरटे, धन्वी जाधव आणि पलाश जिरे यांच्यासह पत्रकारितेतील व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.