पालघरच्या आदिवासी संस्कृतीचा राष्ट्रीय सन्मान; तारपा वादक भिकल्या धिंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री
पालघर | आदिम मीडिया प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरत, वारली आदिवासी समाजातील ज्येष्ठ तारपा वादक भिकल्या धिंडा यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपतींच्या हस्ते हा सन्मान स्वीकारत त्यांनी पालघरसह संपूर्ण आदिवासी समाजाचा गौरव वाढवला आहे.
भिकल्या धिंडा यांनी अनेक दशकांपासून पारंपरिक तारपा वादन आणि वारली संस्कृती जतन करण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या अथक कार्यामुळे आदिवासी लोककला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली असून, या योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
या सन्मानानंतर पालघर जिल्ह्यासह संपूर्ण आदिवासी समाजात आनंदाचे वातावरण असून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. हा पुरस्कार केवळ एका कलाकाराचा नसून आदिवासी परंपरा, संस्कृती आणि लोककलेचा राष्ट्रीय गौरव असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
– आदिम मीडिया पोर्टल
