आदिवासी इंडिया न्यूज
नीट पेपरफुटी आंदोलकांवरील लाठीचार्जचा तीव्र निषेध; कळवणमध्ये 'वंचित'च्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद, कडकडीत बंद
कळवण: दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि महिलांवर प्रशासनाने केलेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. २३) कळवण शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'च्या हाकेला कळवणमध्ये व्यापारी, नागरिक आणि समविचारी संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शांततेत रॅली आणि प्रशासनाचा निषेध
कळवण तालुका वंचित बहुजन आघाडी, समविचारी पक्ष आणि भीमसैनिकांच्या वतीने शहरात कडकडीत बंद पाळून सरकार व प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शहरात शांततेत एका निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून या रॅलीला सुरुवात झाली. महापुरुषांच्या जयघोषात आणि लाठीचार्जच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत ही रॅली मेन रोड, बस स्थानक मार्गे मार्गस्थ होऊन कळवण पोलीस ठाण्याजवळ तिचा समारोप करण्यात आला.
तहसीलदारांना निवेदन
रॅलीच्या समारोपानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाने कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुळे यांना मागण्यांचे आणि निषेधाचे निवेदन दिले. या बंदला कळवण शहरातील व्यापारी, उद्योजक, महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि तमाम नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. शांततापूर्ण मार्गाने बंद यशस्वी केल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
हा बंद वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जगदीश खरे व जिल्हा सचिव राम बस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुकाध्यक्ष प्रकाश बस्ते यांच्या नेतृत्वात पार पडला. या आंदोलनात महासचिव तुषार गांगुर्डे, सचिव भाऊसाहेब गांगुर्डे, तालुका उपाध्यक्ष शशिकांत निरभवणे, दादाजी बस्ते, राजेंद्र गांगुर्डे, राहुल गांगुर्डे, मनोज साळवे, सल्लागार भाऊसाहेब बच्छाव, आरपीआयचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब जगताप, भारत गांगुर्डे, भारत अहिरे, परशुराम बस्ते, समाधान इंगळे, बंटी बस्ते, दिनेश बस्ते, सागर बस्ते, आकाश बस्ते, मगन आहिरे, संजय केदारे यांच्यासह समाजबांधव आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
चोख पोलीस बंदोबस्त
शहरात कडकडीत बंद आणि रॅलीच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण पोलिसांच्या वतीने शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
